बेळगाव / प्रतिनिधी
मलेशिया येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने पार पडलेल्या इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये बेळगावच्या मल्लांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने भारतीय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यात आली होती. कर्नाटकातून बेळगाव व हुबळी येथील मल्लांची निवड होऊन त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत श्रेयश दशरथ हट्टीकर (अंडर -19, 65 किलो) – रौप्य पदक, सिद्धांत निकेश कडाली (अंडर -14, 62 किलो) – कांस्य पदक, शुभम मारुती हट्टीकर (सीनियर, 70 किलो) – रौप्य पदक, विक्रम मंजुनाथ चिलनंवर (अंडर -19, 60 किलो) – रौप्य पदक अशी दमदार कामगिरी करत बेळगावच्या मल्लांनी देशाचा नावलौकिक वाढवला.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पै.अतुल सुरेश शिरोले व पै.अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाचा खेळाडूंना मोठा लाभ झाला. मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष मा. अजयकुमार साळुंखे सर व उपाध्यक्ष मा. विनोद शिंदे सर यांनी सर्व मल्लांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत भारतातून एकूण ३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ६ सुवर्ण, ५ रौप्य व ७ कास्य पदकांसह भारतीय संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या यशामुळे भारतीय कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ मिळाले असून मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन कर्नाटकचे सर्वत्र कौतुक होत आहे.








