विजयपूर / दिपक शिंत्रे
कोयंबतूरमध्ये 1998 साली झालेल्या स्फोटासह विविध दहशतवादी घटनांमध्ये सामील असलेला मुख्य आरोपीस तमिळनाडू पोलिसांनी, दहशतवादविरोधी पथक (ATS) व गुप्तचर विभागाच्या सहकार्याने विजयपूर शहरात अटक केली आहे.
सादिक राजा उर्फ टेलर राजा उर्फ शहजाहान अब्दुल मजीद मकानदार उर्फ शहजाहान शेख (वय 50) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो मूळचा चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट येथील रहिवासी असून, कोयंबतूर स्फोट प्रकरणानंतर कर्नाटकमधील हुबळी व विजयपूर शहरांमध्ये मागील 29 वर्षांपासून लपून राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हुबळीतील एका महिलेशी विवाह केलेल्या आरोपीने मागील 12 वर्षांपासून विजयपूर शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता, असे समजते. प्रकरणाच्या तपासासाठी तमिळनाडू पोलिसांनी त्याला कोयंबतूरला नेले असून, न्यायालयात हजर केले आहे. 1998 साली भाजपचे वरिष्ठ नेते एल. के. अडवाणी यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या स्फोटामध्ये 58 लोकांचा मृत्यू झाला आणि 250 लोक जखमी झाले होते.
1996 मध्ये कोयंबतूर जेलमध्ये त्याने केलेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात एक जेल वॉर्डन ठार झाला होता. “दहशतवादाशी संबंधित प्रकरणांव्यतिरिक्त, 1996 मध्ये नागूरमध्ये झालेल्या सयिता खून प्रकरण आणि 1997 मध्ये मदुरैमधील जेलर जयप्रकाश यांच्या खून प्रकरणातही टेलर राजाला आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.