- शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची गर्दी
बेळगाव / प्रतिनिधी
शहर परिसरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळल्याने संपूर्ण शहर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रविवारी झालेल्या उत्सवानंतर सोमवारी विविध मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत मंदिर परिसर फुलून गेला.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने गर्दी होणार याची दखल घेत देवस्थान समित्यांनी भाविकांसाठी सुलभ दर्शनाची व्यवस्था केली होती. पहाटेपासूनच शिवभक्त फळे, फुले आणि पूजा साहित्य घेऊन मंदिरांकडे जाताना दिसत होते. “ओम नमः शिवाय”च्या घोषात आणि मंत्रोच्चारात मंदिर परिसर दुमदुमला होता.
शहरातील विविध मंदिरांमध्ये रुद्राभिषेक, जलाभिषेक, पंचामृत अभिषेक, होमहवन, महापूजा व आरती यांसारखे धार्मिक विधी पार पडले. पूजा साहित्याच्या स्टॉल्समुळे भाविकांची सोय झाली होती. अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ६ वाजता तसेच दुपारी १२ ते ३ या वेळेत रुद्राभिषेक पार पडला. रात्री पालखी सोहळा आणि महापूजा झाली. सोमवारी आयोजित महाप्रसादाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
याशिवाय मिलिटरी महादेव मंदिर, जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिर, टिळकवाडी महर्षी रोडवरील श्री शिवलिंग मंदिर, गोवावेस येथील ओंकारेश्वर मंदिर, आनंदनगर, शाहूनगर, शहापूर मुक्तिधाम, आयोध्यानगर गणेशपूर तसेच तालुक्यातील कणबर्गी, कडोली, मुचंडी, हंडिभडंगनाथ, मुक्तीमठ आदी ठिकाणीही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अनेक मंदिरांत ओम नमः शिवाय जप, रामनाम जप, प्रवचन, भजन यांचे आयोजन करण्यात आले. टिळकवाडीतील श्री शिवलिंग मंदिरात दोन दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हिंदू धर्म संमेलन समितीच्या वतीने मंदिराला २१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. समितीचे सचिव सुनील नाडगौडा यांनी देणगी मंदिर व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली. यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण उपस्थित होते.
महाशिवरात्रीच्या या भक्तिमय पर्वाची सांगता महाप्रसादाने झाली असून, हजारो भाविकांनी श्रद्धाभावाने सहभाग नोंदविला.








