• पुढील सुनावणी २८ जुलैला : अन्य तीन खटल्यांची सुनावणीही होणार

बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटला क्रमांक १२५/१५ मध्ये साक्षीदारांची साक्षं प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. पुढील सुनावणी २८ रोजी होणार असून त्यादिवशी संशयितांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. त्याचबरोबर अन्य तीन खटल्यांची सुनावणीदेखील २८ जुलैलाच होणार आहे.

येळ्ळूर गावच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक जिल्हा प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून २५ जुलै २०१४ रोजी हटविला होता. या घटनेमुळे येळ्ळूरसह सीमाभागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फलक काढण्यात आल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी धुडगूस घातला. अमानुष लाठीहल्ला आल्याने अनेकजण जायबंद झाले. मात्र उलट पोलिसांनीच ग्रामस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे सात गुन्हे दाखल केले. त्यापैकी तीन खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला असून पोलिसांनी केलेल्या आरोपातून ग्रामस्थांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सध्या खटला क्रमांक १२२, १२५, १२६ आणि ७९४/१५ या खटल्यांची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. त्यापैकी खटला क्रमांक १२५ मध्ये बुधवारी न्यायालयासमोर सुनावणी झाली.

या खटल्यात एकूण ४२ जण आरोपी असून त्यापैकी ७ जणांना वगळण्यात आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मरुळसिद्धाप्पा आर. डी. हे फिर्यादी असून यापूर्वी झालेल्या सुनावणींना ते सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. तरीदेखील ते उपस्थित न राहिल्याने त्यांनाही न्यायालयाने वगळले आहे. बुधवारी सुनावणीवेळी गुन्हा दाखल अधिकारी व तत्कालिन साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नाईक आणि बेळगाव ग्रामीणचे तत्कालिन पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी शेखऱ्याप्पा. एच. यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार असून त्या दिवशी संशयितांचा जबाब नोंदविला जाणार आहे. तसेच अन्य तीन खटल्यांची सुनावणीही त्याचदिवशी होणार आहे. संशयितांतर्फे ॲड. शामसुंदर पत्तार , ॲड. हेमराज बेंचन्नावर , ॲड. शाम पाटील काम पहात आहेत.

  • एका कार्यकर्त्याची रवानगी कारगृहात : 

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटला क्रमांक २०६ मध्ये न्यायालयीन सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याप्रकरणी संपत महादेव कुगजी यांना न्यायालयाने अटक वॉरंट बजावले होते. त्यानुसार पोलिसांनी संपत कुगजी यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यामुळे त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.