• सीमाभागातील २५०० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित

बेळगाव / प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन इतिहासाची जाणीव निर्माण करून त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सलग पाचव्या वर्षी आयोजित होणारी ही स्पर्धा सीमाभागातील सर्वात मोठी सामान्य ज्ञान स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत बेळगाव शहर व ग्रामीण भाग, खानापूर तालुका तसेच निपाणी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मराठा मंदिर कार्यालय व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, खानापूर रोड (बेळगाव) येथे ही स्पर्धा दोन सत्रांत पार पडणार आहे. स्पर्धा सीमाभागापुरती मर्यादित असून ती चार गटांत घेण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक लहान गट (इयत्ता ४ थी पर्यंत), प्राथमिक मोठा गट (इयत्ता ५ वी ते ७ वी), माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी) तसेच महाविद्यालयीन गट (इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर, वय २८ वर्षांपर्यंत) यांचा समावेश आहे. महाविद्यालयीन गटासाठी आंतरराज्यीय विद्यार्थ्यांनाही सहभागाची संधी देण्यात आली आहे.

स्पर्धा सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, शिवकालीन इतिहास, शालेय अभ्यासक्रम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमाप्रश्न या विषयांवरील संदर्भ पुस्तिकेवर आधारित असणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे, पदके, स्मृतिचिन्हे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता होणार असून यंदा सुमारे २५०० स्पर्धक सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.