- उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर तीन शाळांचा सुद्धा विशेष पुरस्कार देऊन होणार सन्मान
बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण देत वेगवेगळे प्रयोग, उपक्रम आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या बेळगाव आणि खानापूर भागातील मराठी शाळांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार २०२५-२६” देऊन गौरव करण्यात येत आहे.
यावर्षी या पुरस्कारासाठी २१ शाळांनी अर्ज केला होता त्यापैकी खालील पाच शाळांना सदर पुरस्कार देण्यात आले आहेत.
1. सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हेमाडगा ता.खानापूर जि.बेळगाव
2. सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळा विजयनगर, जांबोटी ता. खानापूर जि. बेळगाव
3. सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा देसूर ता.जि. बेळगाव
4. सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा हालगा, ता. जि.बेळगाव
5. सरकारी मराठी आदर्श शाळा हिंडलगा, ता. जि.बेळगाव
याव्यतिरिक्त ज्या शाळा सर्वच बाबतीत परिपूर्ण आहेत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत शैक्षणिक यशाच्या शिखरावर आहेत आणि त्याहून अधिक प्रगती साधण्यासाठी धडपड करत आहेत. अशा शाळांना यावर्षीपासून “ज्ञानशिखर सन्मान” पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
यावर्षी खालील दोन शाळांना “ज्ञानशिखर सन्मान” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
1. सरकारी मॉडेल मराठी प्राथमिक शाळा, येळ्ळूर ता. जिल्हा बेळगाव
2. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा कॅम्प बेळगाव.
- विशेष “ज्ञानज्योती पुरस्कार-२०२६”
मर्यादित संसाधने उपलब्ध असून देखील केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रतिकूल परिस्थितीतही दर्जेदार शिक्षण देत अतिशय दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे अतुलनीय कार्य करणाऱ्या “उच्च प्राथमिक मराठी शाळा जामगाव, ता.खानापूर, जिल्हा बेळगाव” या शाळेला विशेष ‘ज्ञानज्योती पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
सदर पुरस्काराचे वितरण “मराठी भाषा गौरव दिनाचे” औचित्य साधून रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे प्रसिद्ध मराठी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक “श्री हेमंत ढोमे” यांच्या हस्ते संपन्न होणार असून संबंधित शाळेच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, शा.सु.समिती, आणि पालकवर्ग यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.








