बेळगाव / प्रतिनिधी

दरवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा पालकांचे कौतुक करावे यासाठी म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येते, आज त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवातमहाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर आणि सुरज कुडूचकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना अंकुश केसरकर म्हणाले मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठविले पाहिजे जेणेकरून आपली भाषा आणि संस्कृतीचे जतन झाले पाहिजे. कॅन्टोन्मेंट शाळेची पटसंख्या २०१६–१७ साली १२० इतकी खालावली होती. पण तेथील शिक्षकांनी प्रयत्न करून वेगवेगळे उपक्रम राबवून आज या शाळेची पटसंख्या ही जवळपास ३५० च्या घरात आहे. तेव्हा याचा आदर्श घेणे गरजेचे आहे.

सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. सलग आठ वर्षे हा उपक्रम सुरू असून यावर्षी ३०० शाळा आणि पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्धार युवा समितीच्या वतीने करण्यात आला आहेअसे सांगितले.

शाळेची माजी विद्यार्थी आणि जेष्ठ विमा सल्लागार अनंत गवळी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, खजिनदार विनायक कावळे, पदाधिकारी सुरज कुडूसकर आशिष कोचेरी, शाळेचे शिक्षक आदी उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत बिर्जे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.