- महापौरांनी हस्तक्षेप केल्याने सभा सुरळीत
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. १२) महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये अनेक वेळा तीव्र वादावादीचे प्रसंग घडले.
सभेत सरकारनियुक्त सदस्य रमेश सोनटक्की यांना महापौरांनी बोलण्यासाठी रुलिंग दिल्यानंतर नगरसेवक रवी धोत्रे यांनी त्यांना थांबवले. या घटनेवर विरोधी गटातील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत, “नियम सर्वांवर समान लागू झाला पाहिजे” अशी भूमिका मांडली. महापौरांनीही “माझ्या सूचनेशिवाय कोणी बोलू नये” असे स्पष्ट निर्देश दिले.
तथापि, त्यानंतरच्या एका विषयावर रवी धोत्रे यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केल्याने विरोधी गटाकडून तीव्र आक्षेप नोंदवला गेला. यावेळी म.ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी धोत्रेंवर टीका करत, “प्रत्येक विषयात तुम्हीच बोलता, इतरांना संधी मिळत नाही; मग तुम्हाला बोलण्याची पॉवर ऑफ अॅटर्नी दिली आहे का?” असा टोला लगावला.
या वक्तव्यामुळे वातावरण ताणले गेले. नगरसेवक धोत्रे यांनी “समितीचे सदस्य आम्हाला कसे बोलू शकतात?” असा प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी गटनेत्यांकडे तक्रार नोंदवली. यावेळी शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे आणि विरोधी गटातील इतर सदस्यांनी साळुंखेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला, ज्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अखेर महापौर मंगेश पवार यांनी हस्तक्षेप करून, “कोणीही विषयांतर करू नये आणि सभेचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,” असे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणली.








