- महापौरांकडून कानउघडणी अन् तातडीने कार्यवाहीचे आदेश
बेळगाव : शहरातील प्रलंबित नागरी कामे, ड्रेनेज समस्या आणि मूलभूत सुविधांतील त्रुटींवरून महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. संतप्त सदस्यांच्या भूमिकेनंतर महापौर प्रीती कामकर यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
बेळगाव महानगरपालिकेच्या परिषद सभागृहात महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शहरातील विविध प्रलंबित नागरी कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक समस्यांवरून वातावरण चांगलेच तापले.
ड्रेनेजच्या प्रश्नावरून नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या प्रभागात पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मन्नत कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याची बाब नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय महामार्गालगतच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबतही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करण्यात आली. नामनिर्देशित सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी जबाबदारी स्वीकारूनही कामात गती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. एल अँड टी कंपनीच्या कामामुळे सिडी वर्कचे नुकसान होऊन पावसाचे पाणी दुकानांत शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्रश्न नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी उपस्थित केला. कलमठ रोड परिसरातील परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
शहरातील नागरी तक्रारींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रस्ते व ड्रेनेजची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड यांनी केली.
दरम्यान, २०१६ मध्ये टाकण्यात आलेल्या भूमिगत केबल्सचा मुद्दाही बैठकीत गाजला. जवळपास ८० टक्के काम पूर्ण असूनही उर्वरित काम रखडल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची नाराजी रेश्मा भैरकदार यांनी व्यक्त केली. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नगरसेवक रवी धोत्रे आणि संदीप जिरग्याळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
महापालिकेची हेल्पलाइन कार्यरत नसल्याने तक्रारी नोंदवताना अडचणी येत असल्याचा मुद्दा नगरसेविका वीणा विजापूरे यांनी उपस्थित केला. या मुद्द्याला नगरसेवक राजशेखर ढोणी यांनी पाठिंबा देत नागरिकांना उत्तर द्यायचे कसे, असा सवाल उपस्थित केला.
अखेर महापौर प्रीती कामकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करत प्रलंबित कामे आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.








