- पोलिस आयुक्तांचा कडक इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिला आहे. मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
नववर्ष स्वागतासाठी शहरभर ४ डीएससी, २४ निरीक्षक, ३४ उपनिरीक्षक, ६६० सीएससी/सीपीसी, ३०० होमगार्ड, ७ सीएआर पथके आणि ३ केएसआरपी पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील सर्व भागांवर सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे सतत पाळत ठेवण्यात येणार असून, रुग्णवाहिका व अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले आहेत.
बार व रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीनांना दारू विक्रीस सक्त मनाई असून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फटाके फोडण्याच्या ठिकाणी सुरक्षा साधने ठेवणे, कार्यक्रमस्थळी प्रवेश-निर्गमनासाठी स्पष्ट फलक लावणे तसेच अल्पवयीनांना निवास न देण्याचे निर्देश हॉटेल मालकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, २२ ते २९ डिसेंबर या कालावधीत शहर हद्दीत १३८ गुन्हे दाखल करण्यात आले असून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने नववर्ष साजरे करण्याचे आवाहन केले आहे.







