बेळगाव / प्रतिनिधी

अकरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भव्य मोर्चाला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर पाठिंबा दिला असून मराठी भाषिक जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जनजागृती मोहीम राबवून मराठी बांधवांना मोर्चामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्धार करण्यात आला. मराठी भाषिकांवर कन्नड प्रशासनाची जबरदस्ती सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये आम्हाला आमच्या मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत, अशी ठाम मागणी करण्यात येणार आहे. या बैठकीतून कोणत्याही परिस्थितीत हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा, असे ठणकावून सांगण्यात आले. या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले , माजी आमदार मनोहर किणेकर, ॲड. एम. जी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.