- मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या एका शिक्षिकेला मार्केट पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
अटक करण्यात आलेली महिला पद्मश्री मजगावी (रा. लक्ष्मीनगर, हिंडलगा, ता. बेळगाव) येथील असून ती शहरातील एका नामांकित खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हैदराबादहून पारेवाडकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अक्षता नावाच्या महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व पैसे चोरीस गेले. बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत आरोपी शिक्षिका चोरी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पकडले जाण्याच्या भीतीने तिने सोन्याचे मंगळसूत्र खिडकीतून खाली फेकून दिले होते, ते पोलिसांनी हस्तगत केले आहे. मात्र, फिर्यादीचे पाकीट व रोख रक्कम अद्याप सापडलेली नाही.
मार्केट पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. या प्रकरणामागे टोळी कार्यरत आहे का, तसेच यापूर्वीही अशा चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








