• बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून एकाला अटक
  • २१.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : मच्छे गावातील वाघवडे क्रॉस जवळील सराफी दुकानांमध्ये गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या चोरीचा बेळगाव ग्रामीण पोलिसांनी यशस्वी तपास करून एकाला अटक केली आहे. आरोपीकडून २० लाखाहून अधिक किमतीचे चांदीचे साहित्य आणि १ लाख ५० हजार रुपये किमतीची टाटा इंडिका कार जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २१,५७,२५० रुपये आहे.

अटक केलेल्या आरोपीचे नाव श्रीनिवास उर्फ शिना उर्फ शिनु (वय ३७, रा. कालिदास बडावणे, ता. कोरटगेरे, सध्या रा. लग्गेरे मार्केट जवळ, बेंगळुरू) असे आहे. चोरीची घटना १८ जानेवारी २०२६ रोजी महेश गोकुळ काकतीकर यांच्या मच्छे गावातील वाघवडे क्रॉस जवळील सराफी दुकानात घडली होती. पीडिताने बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि गुन्हा नोंद करण्यात आला.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त (गुन्हे व रहदारी) आणि बेळगाव ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागणगौडा कट्टीमनीगौड्र यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोरीचा तपास सुरू केला. तपासात आलेल्या धाग्यादोऱ्यांवरून आरोपी श्रीनिवास याला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्या जवळील २०,०७,२५० रुपये किमतीचे चांदीचे साहित्य, तसेच १,५०,००० रुपये किमतीची टाटा इंडिका कार (क्र. केए 03 एस 8668) जप्त करण्यात आली.

सदर कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त (गुन्हे व रहदारी) आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त यांनी पोलीस निरीक्षक कट्टीमनीगौड्र व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आणि शाबासकी दिली आहे.