बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे आयोजित हिंदू सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या हर्षिता ठाकूरसह अन्य सहा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ रोजी अटी व शर्तींसह हा आदेश दिला.

१८ जानेवारी २०२६ रोजी मच्छे येथील हिंदू सभेच्या कार्यक्रमात पिरनवाडीतील एका प्रार्थना स्थळाबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप करत ग्रामीण पोलिसांनी हर्षिता ठाकूर व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पोलीस तपासानुसार या प्रकरणात एकूण पाच जणांविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला होता. आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील कलम १८९(२), १९१(२), १४२, ३०२, ३५२ तसेच १९० अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रत्येकी ५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आरोपींना जामीन मंजूर केला. तसेच तपास प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करणे, न्यायालयात नियमित हजेरी लावणे आणि साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे अशा कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. प्रताप यादव यांनी बाजू मांडली.