- दोघांना अटक ; सीसीबी पोलिसांची धडक कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील अवैध अंमली पदार्थ तस्करीविरोधात सीसीबी पोलिसांनी कारवाई करत मच्छे औद्योगिक परिसरात सुरू असलेला गांजा विक्रीचा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.
सोमवारी सीसीबी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जांबोटी रोडलगत असलेल्या एका जीर्ण इमारतीवर छापा टाकला. या वेळी गांजा विक्री करत असताना कंग्राळी येथील बाळू उर्फ मनोहर हुद्दार आणि संती बस्तवाड येथील सचिन अंकलगी यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
अटक केलेल्या आरोपींकडून सुमारे २.०१० किलो गांजा, ज्याची किंमत अंदाजे १ लाख रुपये आहे, तसेच मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासादरम्यान या प्रकरणामागे महाराष्ट्रातील अहमदनगर येथील एका महिलेचा आणि आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी सीसीबी पथकाचे कौतुक केले आहे.








