• इंग्लंडचा २२ धावांनी विजय ; मालिकेत २ – १ ने आघाडी
  • रवींद्र जडेजाची झुंज अपयशी  

लॉर्ड्स : ‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने सामन्यातील पाचव्या दिवशी १४ जुलैला टीम इंडियावर २२ धावांनी मात केली आणि या मालिकेतील सलग दुसरा विजय मिळवला. इंग्लंडने टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. केएल राहुल याच्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडसमोर संघर्ष केला. मात्र त्यांना दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळाली नाही. इंग्लंडने भारताला दुसऱ्या डावात ७४.५ ओव्हरमध्ये १७० धावांवर ऑलआऊट केले आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडी घेतली आहे.

  • इंग्लंडचा पहिला डाव :

इंग्लंडच्या पहिल्या डावात माजी कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावले. त्याने १९९ चेंडूंमध्ये १०४ धावा करताना १० चौकार मारले. रूटचे हे टेस्ट कारकिर्दीतले ३७ वे आणि भारताविरुद्धचे ११ वे शतक ठरले. ब्रायडन कार्सने ५६ तर विकेटकीपर जेमी स्मिथने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे पहिल्या डावात त्यांनी ३८७ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट घेतले. नीतीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले, तर रवींद्र जडेजानेही एक बळी टिपला.

  • भारताचा पहिला डाव :

भारतीय संघाकडून पहिल्या डावात सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक झळकावले. त्याने १७७ चेंडूंमध्ये १०० धावा करताना १३ चौकार मारले. राहुलचे हे टेस्ट कारकिर्दीतले दहावे शतक असून, त्यापैकी९ शतके परदेशात आली आहेत. उपकर्णधार ऋषभ पंतने ७४ तर रवींद्र जडेजाने ७२ धावांची जबरदस्त खेळी केली. भारतानेही तितक्याच, म्हणजे ३८७ धावा केल्या. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सने सर्वाधिक ३ बळी घेतले. जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. स्पिनर शोएब बशीर आणि ब्रायडन कार्स यांना प्रत्येकी १ यश मिळाले.

  • इंग्लंडचा दुसरा डाव : वॉशिंगटन सुंदरची दमदार गोलंदाजी 

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूटने सर्वाधिक ४० धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्सने ३३, हैरी ब्रूकने २३ आणि झॅक क्रॉलीने २२ धावा करत उपयोगी योगदान दिले. भारताकडून ऑफस्पिनर वॉशिंगटन सुंदरने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 बळी मिळवले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. नीतीश कुमार रेड्डी आणि आकाश दीप यांनी सुद्धा प्रत्येकी १ विकेट मिळवली. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला.

  • भारताचा दुसरा डाव :

लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघाची दुसऱ्या डावात सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वालची विकेट गेली, जो आपले खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने करुण नायर (१४ धावा), कर्णधार शुभमन गिल (६ धावा) आणि नाईटवॉचमन आकाश दीप (१ धाव) यांचे विकेटही गमावले.

आज भारताने चार विकेटवर ५८ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सहा विकेट शिल्लक होत्या. त्यावेळी राहुल क्रीजवर होता. सुरुवातीच्या सत्रात भारताने ऋषभ पंत (९ धावा), केएल राहुल (३९ धावा) यांचे बळी गमावले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला खाते उघडता आले नाही. त्यानंतर नितीशही पॅव्हेलियनमध्ये परतला. जोफ्रा आर्चरने तीन विकेट घेतल्या आहेत, तर बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली आहे.

सामन्याचा प्रारंभ दोन्ही संघांनी सारख्याच ताकदीने केला होता. इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावांची दमदार खेळी केली, त्याला भारतानेही तितक्याच धावांनी म्हणजे ३८७ धावांनी प्रत्युत्तर दिले. इंग्लंडने दुसऱ्या डावात भारतापुढे १९३ धावांचे आव्हान उभे केले, पण पाचव्या दिवशी एकामागोमाग एक विकेट्स कोसळल्या आणि भारताचा डाव अवघ्या १७० धावांवर आटोपला.

कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत, करुण नायर, यशस्वी जैस्वालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण सर्वांची कामगिरी अपुरी ठरली. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर इंग्लंडनी आपल्या अनुभवाचा आणि परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि विजय मिळवला.