बेळगाव / प्रतिनिधी

सोमवारी सकाळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ, महापौर मंगेश पवार, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, मनपा आयुक्त बी शुभा यांनी आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मार्गाला भेट देऊन चर्चा करत मार्गदर्शन केले. सकाळी राणी चन्नम्मा सर्कल पासून निघालेल्या या मान्यवरांनी काकतीवेस रोड, शनिवार खुंट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, हेमूकलानी चौक, शनी मंदिर, रेल्वे ब्रिज व कपिलेश्वर मंदिर येथील श्री गणेश विसर्जन तलावाला भेट दिली. याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संपर्क अधिकारी प्रमुख विकास कलघटगी, माजी महापौर सतीश गौरगौंडा, हेस्कॉम खाते, वनखाते, पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने या फेरीत भाग घेतला होता.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा आता बहरात आला आहे. पाचव्या दिवसांच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे त्यामुळे आता अनंत चतुर्दशी दिवसाच्या विसर्जनासाठी तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून याबाबत दक्षता घेण्यासाठी या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. त्याचबरोबर योग्य सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील असे पोलीस आयुक्तांनी यावेळी म्हटले.