• जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्याच्या रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात तीन दिवसांच्या नवजात बालिकेची गळा दाबून खून हत्या केल्याप्रकरणी आरोपी आईविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

मंगळवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, अश्विनी हलकट्टी या महिलेने स्वतःच्या नवजात बालिकेच्या मानेवर दाब देऊन श्वास रोखल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तिला आधीपासून तीन मुली असून पुन्हा मुलगीच जन्मल्याने हा प्रकार घडल्याचा संशय तपासात निष्पन्न झाला आहे.

या प्रकरणाची तक्रार आरोपीची आई रेणुका हलकट्टी यांनी पोलिसांकडे नोंदवली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी महिला सध्या गर्भवती असल्याने तिच्या आरोग्याचा आणि डॉक्टर्सच्या अहवालाचा विचार करून पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे एसपी गुळेद यांनी स्पष्ट केले.