• रांगोळी – फुलांची सजावट ; फटाक्यांची आतिषबाजी

बेळगाव / प्रतिनिधी

आकर्षक रांगोळ्या, विद्युत रोषणाईने खुललेली सजावट, केळीचे खांब आणि झेंडूच्या माळांनी सजलेली दुकाने अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी लक्ष्मी-कुबेर पूजन झाले. पूजनानंतर व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सायंकाळी पाचपासून नऊपर्यंत लक्ष्मीपूजनाची धामधूम होती. व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होत असल्याने कीर्दचे पूजनही करण्यात आले.

सायंकाळी सहानंतर शहर उपनगरातील विविध गल्लीत पूजा व आरतीची लगबग होती. पण सायंकाळी सातच्या सुमारास काहीवेळ हजेरी लावलेल्या पावसाने नागरिकांच्या उत्साहावर पाणी पडले. दिवसभर लक्ष्मीपूजनाच्या तयारीची धांदल सुरु होती. ऊस, केळीचे खांब, झेंडूच्या माळा खरेदी करुन पूजेची मांडणी आणि दुकानांची सजावट करण्यात येत होती. केळी, ऊस व झेंडू विक्रेत्यांकडे मंगळवारी सकाळी खरेदीसाठी गर्दी होती.

व्यापारीवर्ग दिवसभर लक्ष्मी पूजनाच्या तयारीत गुंतले होते. प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्यात आले होते. पूजापाठ सभोवती केळी उभारून लक्ष्मीची प्रतिमा ठेवण्यात आली होती. झेंडूच्या माळांनी दुकाने सुशोभित करण्यात आली होती. दुकानांसमोर रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.

कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांच्या उपस्थितीत लक्ष्मीची पूजा, आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला. कुटुंबातील सदस्य आणि नातलगांची लक्ष्मीपूजनाला उपस्थिती असल्याने कौटुंबिक वातावरण होते. आरतीनंतर ऐश्वर्य, संपत्ती, समृध्दी व चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रसाद म्हणून खोबरे, लाह्या, फुटाणे, बत्तासे, चुरमुरे, पेढे वाटप करण्यात आले. कुटुंब व नातलगांसमवेत सामूहिक फोटो काढण्याचा आनंद घेतला जात होता. लक्ष्मी पूजनानिमित्त विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन घेण्यात येत होते. फराळाचे पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जात होते.

  • पावसामुळे हिरमोड :

लक्ष्मीपूजनानिमित्त शहर उपनगरातील परिसर विद्युत रोषणाईने उजळला होता. पणत्या आणि विद्युत माळांचे तेज लक्षवेधी होते. मात्र, सायंकाळी हजेरी लावलेल्या पावसामुळे व्यापारीवर्गाचा हिरमोड झाला. अर्ध्या तासात पाऊस थांबताच गल्लीगल्लीत रोषणाई आणि फटाक्यांचे आवाज घुमू लागले. दुकानचालकांकडून मित्र, नातलग यांना मिठाई व भेटवस्तू देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.