चिक्कोडी / वार्ताहर
चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावात लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून एका तरुणाने साथीदारांसह तरुणी आणि तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुणीच्या आई-वडिलांसह कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बीरप्पा कज्जन्नवर हा गेल्या काही काळापासून संबंधित तरुणीशी विवाहासाठी आग्रह धरत होता. मात्र, कुटुंबीयांनी प्रस्ताव नाकारल्याने संतप्त झालेल्या आरोपीने सुमारे दहा जणांच्या टोळीसह पीडितांच्या घरात घुसखोरी केली. हल्लेखोरांनी प्रथम घरातील सदस्यांच्या डोळ्यात तिखट फेकून त्यांना असहाय्य केले आणि त्यानंतर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेदरम्यान घरातील साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. लग्नास नकार दिल्यामुळेच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप पीडित तरुणीकडून करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.







