प्रवासीवर्गात समाधान : आजपासूनच दुचाकी – चारचाकी वाहने अधिकृतपणे धावणार
कणकुंबी / वार्ताहर
बेळगाव – चोर्ला – गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलावरून केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहतूक सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी 1 जुलैपासून या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार सोमवारपासून फक्त दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाच्या दुतर्फा भराव घालून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात व्यत्यय आल्याने दुचाकी व चारचाकी वाहतूक सुरू करण्यास विलंब झाला.
नवीन पुलाला दहा दहा फुटांवर सहा कमानी (बरगे) असून चार कॉलम दोन फुटांच्या रूंदीचे तर दोन कॉलम चार फुटांच्या रूंदीचे बनविण्यात आले आहेत. एकंदरीत या ना त्या कारणाने नवीन पुलाचे काम रेंगाळल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक तीनवेळा बंद करण्यात आली. सदर नवीन पुलाच्या बांधकामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात करण्यात आली. मे अखेरपर्यंत नवीन पुलाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराने घेतली होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्यात येणारे काम रेंगाळत गेले. हा पूल आता पूर्ण झाला असून त्यामुळे सोमवारपासून हा पूल केवळ दुचाकी व चारचाकी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आज 1 जुलैपासूनच या पुलावऊन दुचाकी आणि चारचाकी वाहने अधिकृतपणे धावणार आहेत.
- पर्यायी रस्ता खचल्याने तीन वेळा वाहतूक केली बंद :
या पुलाचे बांधकाम हाती घेण्यापूर्वी मलप्रभा नदीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी नदीपात्रात दहा पाईप घालून पर्यायी रस्ता आणि पूल बनवण्यात आला होता. 20 जानेवारीपासून या पर्यायी रस्त्यावरूनच संपूर्ण वाहतूक सुरू होती. परंतु मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने 25 मे रोजी नदीतील रस्ता खचला. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. दोन दिवसांनंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी दहा पाईप घालून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. परंतु पुन्हा 8 जून रोजी मलप्रभा नदीत बनवलेला पर्यायी मार्ग पुन्हा खचल्याने बेळगाव – चोर्ला – गोवा अशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा रस्त्याची दुरुस्ती करून दोन दिवसांनी पुन्हा दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला होता. यावेळी मात्र गेले चार दिवस कणकुंबी पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने 15 जून रोजी मलप्रभा नदीच्यापात्रात बनवलेला पर्याय रस्ता वाहूनच गेला. त्यामुळे बेळगाव – चोर्ला- गोवा अशी वाहतूक तिसऱ्यांदा पूर्णपणे बंद करण्यात आला होता.
- चोर्ला ते रणकुंडये रस्त्याच्या कामाला चालना :
बेळगाव – चोर्ला – पणजी रस्त्यांपैकी रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या 43.5 कि. मी. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान सुरुवात करण्यात आली. बेळगाव चोर्ला पणजी हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 ए. ए. बेळगाव विभागांतर्गत येत असून सदर रस्त्याचे कंत्राट हुबळी येथील एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. रस्त्यासाठी सरकारकडून 58.90 कोटी रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार 35.30 कोटी रुपयांचे टेंडर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. अखेर बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांपैकी 26.130 कि. मी. ते 69.480 कि.मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43 कि. मी. रस्त्याच्या डांबरीकरणापैकी चोर्ला ते बैतूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

- नूतन पुलाचे काम रेंगाळल्याने वाहतुकीवर परिणाम :
बेळगाव – गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण व धोकादायक बनला होता. सदर पुलावरून प्रमाणापेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे पूल धोकादायक बनला होता. म्हणून नवीन पूल मंजूर करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून वेळोवेळी केली जात होती. त्यानुसार नवीन पुलाला चालना मिळाली. नूतन पुलासाठी वेगळा निधी मंजूर नसून रस्त्याच्या डांबरीकरण आणि पुलासाठी मंजूर झालेल्या निधीतूनच मलप्रभा नदीवरील पुलाचे बांधकाम बांधण्यात हाती घेण्यात आले. सदर ब्रिटिशकालीन जुना पूल काढून त्याच ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नवीन पूल 90 मीटर लांब तर साडेपाच मीटर रुंदीचा उभारण्यात आला आहे.
- सहाचाकी आणि अवजड वाहनांना बंदी :
अद्याप नवीन पुलाचे काम अर्धवट राहिलेले आहे. केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. या पुलावरून सहाचाकी तसेच अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नवीन पुलाच्या संरक्षक भिंत आणि कठड्याचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील सहाचाकी आणि अवजड वाहतूक खानापूर आणि बेलूरमार्गे वळविण्यात आली आहे.