- शेतकरी मधू पाटील यांना मोठा आर्थिक फटका
बेळगाव / प्रतिनिधी
कुमारस्वामी लेआउट परिसरातील एका खासगी जागेत मालकाची परवानगी न घेता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मध्यरात्री सागवानाची मौल्यवान झाडे मोठ्या प्रमाणावर तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शेतकरी मधू पाटील यांनी १९९० पासून स्वतःच्या शेतजमिनीत मेहनतीने सुमारे ७०० सागवानी झाडांची लागवड केली होती. तब्बल ३६ वर्षांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या या झाडांमुळे पर्यावरणाला मोठा आधार मिळत होता, तसेच त्यांचे आर्थिक मूल्यही लक्षणीय होते. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी त्यांच्या जागेत बेकायदेशीर प्रवेश करून ९० पेक्षा अधिक प्रौढ झाडांची कत्तल केली.

या घटनेमुळे मधू पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पर्यावरणालाही मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊनही वनविभागाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकारामागील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यावरण कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच, शहरात कार्यरत असलेल्या एखाद्या बेकायदेशीर वृक्षतोडीच्या टोळीचा यामागे हात असण्याची शक्यता मधू पाटील यांनी व्यक्त केली आहे.








