बेळगाव / प्रतिनिधी
जन्मदात्या बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेळगाव शहरात उघडकीस आली आहे. बेळगाव शहरात मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबात माणुसकीला काळिमा फासणारा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नराधम बाप आपल्या अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करत होता. विशेष म्हणजे, या प्रकारात पीडितेच्या आईनेच बापाला साथ दिल्याची माहिती आहे.
याप्रकरणी मार्केट पोलिसांनी तातडीने कारवाई करत नराधम बाप आणि निर्दयी आई या दोघांनाही अटक केली असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या क्रूर कृत्याची माहिती असूनही, मुलीचे रक्षण करण्याऐवजी स्वतःच्या आईनेच पतीला साथ दिल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर मार्केट पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून मार्केट पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी आज शनिवारी दोन्ही आरोपींना बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडितेच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.








