- होसूर येथील स्पर्धेत प्रथमच तृतीय क्रमांकाची कमाई
- जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर घडवला इतिहास
उचगांव / वार्ताहर
कोनेवाडी (ता. बेळगाव) गावात कधीच कबड्डी संघ नसताना, गावातील युवकांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इतिहास घडवला आहे. २०२३ पासून नियमित सराव सुरू करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने खचून न जाता, त्यांनी सातत्य टिकवून ठेवले.
दि. २० डिसेंबर २०२५ रोजी गावात झालेल्या ४५ ते ४८ किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत सहभाग घेत त्यांनी कोनेवाडीत कबड्डी संघ तयार होत असल्याचा आत्मविश्वास दाखवला. मात्र, या स्पर्धेत यश न मिळाल्याने निराशा आली.
तरीही हार न मानता, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी होसूर (ता. चंदगड) येथे झालेल्या रात्रीच्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होत कोनेवाडी संघाने पहिल्यांदाच तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे गावाचा नावलौकिक वाढला असून संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणतेच आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांनी या संघाच्या मेहनतीचे विशेष अभिनंदन करत, भविष्यात कठोर परिश्रमाच्या बळावर कोनेवाडीचा कबड्डी संघ नक्कीच विजेतेपद मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.








