- पावसातही लोकांचा सहभाग
बेळगाव / प्रतिनिधी
वीरांगना कित्तूर चन्नम्माच्या अदम्य शौर्याचा आणि ब्रिटिशांविरुद्धच्या विजयाचा गौरव करण्यासाठी साजरा होणारा ‘कित्तूर चन्नम्मा उत्सव’ यंदा हलक्या तुषारवृष्टीच्या वातावरणातही मोठ्या उत्साहात सुरू झाला.
राज्याच्या विविध भागांतून प्रवास करत ‘विजय ज्योत’ शनिवारी कित्तूरमध्ये दाखल झाली. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी चन्नम्मा चौकात या विजय ज्योतीचे स्वागत केले आणि कित्तूर संस्थानाचा ध्वज फडकवून उत्सवाचे औपचारिक उद्घाटन केले.
यानंतर कित्तूर चन्नम्मा, संगोळी रायण्णा आणि अमटूर बाळप्पा यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील, आसिफ सेठ, कलमठ मठाचे मडीवाळ राजयोगेंद्र स्वामीजी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद उपस्थित होते. नेहमीप्रमाणे, यंदाही जिल्हाधिकारी रोशन यांनी गडादमरडी येथे उत्सवाचा ध्वजारोहण सोहळा पार पाडला.

उत्सवाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेली लोककलांची चित्ररथ मिरवणूक यंदाही रंगतदार ठरली. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चन्नम्मा चौकातून हिरवे निशाण दाखवून मिरवणुकीचा शुभारंभ केला. या मिरवणुकीत राज्यभरातील लोककला पथकांनी पारंपरिक नृत्य, ढोल-ताशे आणि विविध संस्कृतींचे दर्शन घडवले. विविध विभागांनी शासनाच्या योजनांवर आधारित आकर्षक चित्ररथ सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
किल्ला परिसरात उभारलेल्या वस्तू, फळ आणि पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात कृषी, आरोग्य, उद्यानविद्या यांसह १२१ दालने उभारण्यात आली असून, ३७ खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स नागरिकांसाठी आकर्षण ठरले आहेत. पावसाचे अधूनमधून आगमन असूनही नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्सवाला रंगत आणली.
दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कित्तूर उत्सवाला उपस्थित राहणार असून, सायंकाळी सात वाजता मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर किल्ला तलावाजवळील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.