बेळगाव / प्रतिनिधी
म. फुले व राजर्षी शाहूंचे कृतिशील अनुयायी, बेळगावचे सच्चे सत्यशोधक कार्यकर्ते व विचारवंत संपादक राष्ट्रवीरकर शामराव देसाई स्मृती पुरस्कार महाराष्ट्रातील सत्यशोधक कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले व विचारवंत कार्यकर्त्या प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे. आज दि. 4 डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण प्रख्यात इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते खानापूर येथील छत्रपती शिवस्मारकात होणार आहे.
किशोर ढमाले हे सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य सेक्रेटरी आहेत. १९८८ पासून पूर्णवेळ विनामानधन सत्यशोधक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात शेतकरी विद्यार्थी आंदोलन (१९९२). बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेल्या आदिवासींच्या जमीन लुटीविरोधात आदिवासी शेतकरी आंदोलन (२००६). शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती व शेतीमाल रस्ता भाव आंदोलन (२०१७). पुणे जिल्ह्यातील विमानतळ विरोधी शेतकरी आंदोलन (२०१९), दिल्ली येथे १३ महिने चाललेल्या शेतकरी आंदोलनात सहभाग (२०२०) आणि नंदुरबार ते मुंबई आदिवासी शेतकरी पायी बिऱ्हाड मोर्चाचे नेतृत्व (२०२३) असा संघर्षरत कार्यकर्ता म्हणून किशोर ढमाले महाराष्ट्राला परिचित आहेत. छत्रपती शिवाजी बदनामी विरोधातील लढा, हिंदी सक्तीविरोधातील मराठी आंदोलन अशा सांस्कृतिक आंदोलनातही ते आघाडीवर आहेत.
प्रतिमा परदेशी पुण्यातील आप्पासाहेब जेधे महाविद्यालयात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून शिवइतिहास व महामानवांच्या बदनामीचे षडयंत्र, राज्यघटना फेरआढाव्याचे राजकारण, सत्यशोधक डॉ. विश्राम रामजी घोले, योद्धा सत्याग्रही दादासाहेब गायकवाड, डॉ. आंबेडकर आणि स्त्री मुक्ती, अब्राम्हणी स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या दिशेने अशा १५ संशोधन व प्रबोधनपर पुस्तके व ग्रंथांच्या त्या लेखिका आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्र अध्यक्ष असून सत्यशोधक जागर या मासिकाच्या २००८ पासून संपादक आहेत.
या दांपत्याने स्वतः सत्यशोधक विवाह केला असून प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात उभारली आहे. याबद्दल त्यांना ज्योतीसावित्री जीवनसाथी पुरस्कार व शिवस्पर्श, कॉ दत्ता देशमुख इ. पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा.प्रतिमा परदेशी यांना यापूर्वी सत्यशोधक चळवळीच्या पत्रकारितेबद्दल ‘दीनमित्र’ कार मुकुंदराव पाटील पुरस्कार मिळालेला आहे.
किशोर ढमाले व प्रा. प्रतिमा परदेशी यांना राष्ट्रवीर शामराव देसाई पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा समितीचे सदस्य शिवाजीराव देसाई यांनी केली आहे. प्राचार्य आनंद मेणसे, प्राचार्य अनंतराव देसाई, भाई राजाभाऊ पाटील, प्रकाश आ. मरगाळे, दिगंबर य. पाटील (माजी आमदार) हे पुरस्कार समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. यापूर्वी डॉ. बाबा आढाव, भाऊसाहेब पोटे, डॉ. आ. ह. साळुंखे, भाई एन डी पाटील, श्री. पन्नालाल सुराणा, डॉ. भारत पाटणकर, कॉम्रेड कृष्णा मेणसे या मान्यवर साहित्यिक, विचारवंत, नेते यांना देण्यात आलेला आहे. पंचवीस हजार रु., सन्मानचिन्ह, घोंगडी व पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
जल, जंगल, जमीन हक्क, शेतीमाल भाव, कर्जमुक्ती यासाठीच्या आदिवासी व शेतकरी आंदोलनात अग्रेसर असणारे आणि सत्यशोधक प्रबोधनाची विद्रोही सांस्कृतिक चळवळ गतिमान करणाऱ्या, जातवर्गस्त्रीदास्य अंतक समतेसाठी लढणाऱ्या सत्यशोधक किशोर ढमाले व प्रा. प्रतिमा परदेशी यांना यावर्षीचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल बेळगावमधील बहुजन समाज व सत्यशोधक समाजाला विशेष आनंद झाला आहे.








