• बिशप डेरिक फर्नांडिस

बेळगाव / प्रतिनिधी

‘ख्रिसमस’ हा केवळ आनंदाचा उत्सव नसून तो आशा, नम्रता आणि गरिबांशी एकजुटीच्या भावनेतून साजरा केला जाणारा सण आहे, असे प्रतिपादन बेळगावी धर्मप्रांताचे बिशप डेरिक फर्नांडिस यांनी केले.

वार्षिक ख्रिसमस संदेशानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बिशप फर्नांडिस म्हणाले की, ख्रिसमसचा मूळ अर्थ गरिबांशी जोडलेला आहे. हा सण गरिबांसाठी, गरिबांचा आणि गरिबांसोबत साजरा करण्याचा आहे. त्यामुळे विश्वासूंनी केवळ सणापुरते मर्यादित न राहता न्यायासाठी कार्य करावे आणि करुणेवर आधारित समाज उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा.

ख्रिश्चन समाजाला केवळ दानधर्मापलीकडे जाऊन विचार करण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, या ख्रिसमसमध्ये गरिबांकडे फक्त देणगीदार म्हणून नव्हे, तर सहप्रवासी म्हणून पाहण्याची गरज आहे. गरिबांच्या जीवनात जाणीवपूर्वक सहभागी होऊन त्यांच्या दुःखात आणि संघर्षात सोबत उभे राहणे हाच ख्रिसमसचा खरा संदेश आहे.

“गरिबांच्या चेहऱ्यात आपल्याला ख्रिस्ताचे दर्शन घ्यायला हवे. त्यांच्या कथा ऐकल्या पाहिजेत, त्यांच्या संघर्षात सहभागी व्हायला हवे आणि त्यांना देवाने दिलेल्या प्रतिष्ठेची जाणीव करून दिली पाहिजे. जेव्हा आपण गरिबांसोबत चालतो, तेव्हाच ख्रिसमसचा खरा अर्थ उमजतो आणि खऱ्या एकजुटीतून मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव येतो,” असेही बिशप फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.