बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या दक्षिण भागातील शहापूर, वडगाव आणि खासबाग परिसरात संस्थानकालीन परंपरेनुसार पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रंग, पाणी, डीजेच्या तालावर नृत्य आणि विविध मुखवट्यांनी सजलेल्या मिरवणुकांमुळे परिसरात रंगोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.

सकाळपासूनच रस्त्यांवर तरुणाईसह लहान मुले, महिलांनी एकमेकांवर रंग उधळत सणाचा आनंद लुटला. रंगांच्या पिशव्या आणि पिचकाऱ्यांसह युवक-युवती दुचाकींवरून परिसरात फिरत होते. समोर येणाऱ्या नागरिकांवर रंगांची उधळण करत त्यांनी होळीच्या शुभेच्छा देत वातावरण रंगमय केले. या उत्सवात नगरसेवक रवी साळुंके यांचाही सहभाग होता.

यंदाच्या रंगपंचमीचे विशेष आकर्षण म्हणजे विविध आकारांचे रंगीबेरंगी मुखवटे परिधान केलेले तरुण-तरुणी. तसेच रेन डान्ससाठी उभारलेल्या मंडपांमध्ये स्प्रिंकलर्स आणि पाण्याच्या कारंजाखाली तरुणाईने मनसोक्त नृत्य केले. डीजेवर वाजणाऱ्या रिमिक्स गाण्यांसह पारंपरिक लोकगीतांच्या तालावर युवक-युवती थिरकताना उत्साह ओसंडून वाहत होता. महिलांनी रंगीत पाण्याच्या घागरी युवकांवर व वाहनधारकांवर ओतून सणाचा आनंद द्विगुणित केला.

रंगोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिस विभागाने कडक बंदोबस्त ठेवला होता. शहराचे पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहापूर व वडगाव परिसरात भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि नागरिकांना सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.


एकंदरीत डीजेचा दणदणाट, रेनडान्सचा जल्लोष आणि रंगांची उधळण अशा वातावरणात शहापूर, वडगाव व खासबाग परिसरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.








