बेळगाव / प्रतिनिधी
शहरासह परिसरात बुधवारी खंडेनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. परंपरेनुसार या दिवशी शस्त्रपूजन करून देवीची आराधना करण्यात आली. दरम्यान बाजारपेठेत ऊस, फुले, फळे आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने गजबजलेले दृश्य दिसून आले.
नवरात्रोत्सवातील नववा दिवस हा शस्त्रपूजनाचा मानला जातो. यानिमित्ताने शेतकरी शेतीची साधने व हत्यारे, व्यावसायिक आपले व्यवसायिक साहित्य तर वाहनधारक आपल्या वाहनांचे पूजन करून सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात.
सणाच्या तयारीमुळे शहरातील गणपत गल्ली, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस यांसह विविध भागातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या होत्या. ऊस मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची विशेष गर्दी दिसली. झेंडूच्या हाराची ७० ते ६० रुपये, तर उसाची १०० रुपयाला पाच अशा दराने विक्री होत आहे. बाजारात ऊस मोठ्या प्रमाणात दाखल झाला असून त्याच्या खरेदीसाठी काही ठिकाणी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
दरम्यान उद्या दसरा सण साजरा होणार असून, त्यासाठी शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.