- तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलेच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण
- हिडन कॅमेऱ्याचा धक्कादायक प्रकार उघड
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका महिलेचे वैयक्तिक क्षण छुप्या पद्धतीने चित्रीत करून खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ५० लाख रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी माळमारुती हद्दीतील एका घरात लाईट बल्बच्या होल्डरमध्ये हिडन कॅमेरा बसवून महिलेचे खासगी क्षण गुप्तपणे चित्रीत केले. नंतर हे व्हिडिओ दाखवून आरोपींनी पीडित महिलेकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने कारवाई करत समीर शेख, अब्दुल रशीद मकानदार आणि मोहम्मद दिलावर या तिघांना अटक केली. आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घरांमध्ये किंवा खासगी ठिकाणी संशयास्पद उपकरणे आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला बळी न पडता धैर्याने तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.







