खानापूर / प्रतिनिधी

डॉल्बीचा दणदणाट, नाचण्याचा धांगडधिंगा, प्रिवेडिंग शूटिंग, बडेजाव दाखवण्यासाठी केला जाणारा खर्च यासर्व गोष्टींना फाटा देत आचारसंहिता पाळत चन्नेवाडी (ता.खानापूर) येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील यांचे चिरंजीव विनय व खानापूर तालुक्यातीलच अल्लेहोळ  गावचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग सटवाप्पा पाटील यांची कन्या मयुरी यांचा शुभविवाह रविवार दि. ८ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर नंदगड येथील दक्षिण विभाग सोसायटीच्या हॉलमध्ये अगदी साध्या पद्धतीने पार पडला.

अलीकडच्या काही वर्षापासून मराठा समाजातील विवाह हे मुहूर्तावर लागत नाहीत. डॉल्बीचा अतिरेक करून मुहूर्तापूर्वी व नंतर तरुण वर्ग धुंद, हुंड्याची देवाण घेवाण, प्रिवेंडिंग शूटिंग व कर्ज काढून बडेजाव करत लग्न करण्याची प्रथा रूढ होत चाललेली आहे. यावरून समाजातील सुज्ञ लोकांतून नाराजीचा सूर दिसून येऊ लागला. यावर सुधारणा आणण्यासाठी व आपल्या पारंपरिक,सांस्कृतिक पद्दतीने लग्न व्हावे यासाठी प्रयत्नही करूनही या सर्व गोष्टींना बगल देण्यात येत होती. यामुळे समाजाची तसेच वधू व वर पक्षाची बदनामी होत होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाने घालून दिलेल्या आचारसंहितेतील बहुतांशी नियम पाळून केवळ पंधरा दिवसांच्या अवधीत नातेवाईक, मित्रमंडळी व समाजातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा वर व वधू पक्षाने पार पाडला. या दोन्ही कुटुंबांचा व पंच म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.