• केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडून हिरवा झेंडा

खानापूर / प्रतिनिधी

खानापूरवासियांची अनेक वर्षांपासूनची अपेक्षा अखेर पूर्ण झाली असून हुबळी-दादर एक्स्प्रेसला अखेर खानापूर स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हुबळी-दादर एक्स्प्रेस (क्रमांक १७३१७) ला एक मिनिटाचा थांबा देत प्रतीकात्मक हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आता ही गाडी दररोज सायंकाळी ५.५५ वाजता खानापूरला येऊन ५.५६ वाजता बेळगावच्या दिशेने निघेल. तर दादर-हुबळी एक्स्प्रेस (क्रमांक १७३१८) सकाळी ८.४० वाजता येथे पोहोचून ८.४१ वाजता हुबळीकडे प्रयाण करेल.

खानापूर स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे विभागाने तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये फलाटाचा विस्तार, नवीन स्वच्छतागृहे तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा समावेश आहे. मंत्री सोमण्णा यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या प्रसंगी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, राज्यसभा सदस्य ईरन्ना कडाडी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार व बीडीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांसह इतर भाजप पदाधिकारी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते.