खानापूर / प्रतिनिधी

खानापूर – लोंढा राष्ट्रीय महामार्गावर तिओलीवाडा क्रॉस परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एक हरण जागीच ठार झाले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हरण अचानक रस्त्यावर धावत आले असता वेगात येणाऱ्या वाहनाला त्याला चुकवता आले नाही. ही धडक इतकी जोराची होती की हरणाचा तत्काळ मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुंजी विभागाचे सहायक वनपाल राजू पवार यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत शहानिशा केली आणि प्राथमिक तपास करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. त्यानंतर उपवनसंरक्षक सुनिता निंबरगी, तसेच लोंढा वनविभागाचे वनक्षेत्रपाल वाय.पी.तेज यांनी पंचनामा करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. कायदेशीर कारवाईनंतर वन विभागाच्या देखरेखीखाली मृत हरणावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया करण्यात आली. या अपघातामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेक प्राणी महामार्गावर येत असल्याने अशा अपघातांची संख्या वाढत असल्याची वन विभागाची चिंता वाढत आहे. वनविभागाने वाहनचालकांना विशेष आवाहन केले आहे की जंगल परिसरातून जाणाऱ्या महामार्गाच्या पट्ट्यात वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा, सावधगिरीने वाहन चालवावे आणि रस्ता ओलांडणाऱ्या प्राण्यांची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त दक्षता घ्यावी.