खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक आणि लोकप्रिय अधिकारी, उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार (वय ५०) यांचे मंगळवार, दि. ३० रोजी अल्प आजाराने निधन झाले.
बेळगाव तालुक्यातील कडोली येथील रहिवासी कल्लाप्पा कोलकार गेली ८–१० वर्षे खानापूर तहसीलदार कार्यालयात उप तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि कर्तव्यनिष्ठ वृत्तीमुळे त्यांनी अधिकारी-कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांमध्ये लौकिक मिळवला होता. उप तहसीलदार पदावर असताना देखील ते नेहमी नम्र राहिले आणि कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्येस तत्परतेने मदत करत राहिले.
मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांचे आरोग्य नीट नव्हते. अखेर मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कडोली येथे त्यांचा मृत्यू झाला. पार्थिवाचे अंत्यसंस्कार बुधवारी कडोली येथे करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ-बहीण असा मोठा कुटुंब आहे. त्यांच्या निधनाने खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.