- विविध पुरस्कारांचे होणार वितरण
पुणे : पुण्यात स्थायिक खानापूर (बेळगाव) तालुक्यातील नागरिकांसाठी मातृसंस्था म्हणून कार्यरत ‘खानापूर (बेळगाव) मित्रमंडळ, पुणे’ तर्फे येत्या शनिवार,२१ मार्च २०२६ रोजी भव्य महिला दिन व वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुणे शहरातील वडगाव-धायरी येथील मुक्ताई गार्डन मध्ये दुपारी ३ वाजता सुरू होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री.विजय पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचा उद्देश पुण्यात स्थायिक खानापूरवासीयांना एकत्र आणणे आणि समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करणे हा आहे. यासाठी कार्यक्रमाचे नियोजन कार्याध्यक्ष श्री. रामचंद्र बाळेकुंद्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने होणार असून, मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन देतील. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती राहणार असून, स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांसाठी मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘KBMM पुरस्कार’ सोहळा. यामध्ये समाजासाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या व्यक्तीला ‘KBMM जीवनगौरव पुरस्कार’. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘KBMM ज्ञानरत्न पुरस्कार’. व्यापार आणि उद्योगात भरारी घेणाऱ्या उद्योजकांसाठी ‘KBMM उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
खानापूर (बेळगाव) परिसरातील जे नागरिक सध्या पुणे आणि परिसरात वास्तव्यास आहेत, त्यांनी या कौटुंबिक स्नेहमेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आपल्या भागातील लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्वांनी अगत्याने यावे, असे आवाहन आयोजक खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.







