- मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
- कर्नाटक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक आज ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. माजी आमदार मनोहर किणेकर हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक सरकार ८ डिसेंबर रोजी बेळगावात हिवाळी अधिवेशन घेणार असल्याने, त्याला प्रत्युत्तर म्हणून होणाऱ्या महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, एम. जी. पाटील, आबासाहेब दळवी, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, रामचंद्र मोदगेकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. मालोजी अष्टेकर यांनी मागील निर्णयांचे वाचन केले तर प्रकाश मरगाळे यांनी आतापर्यंत झालेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. सदस्यांनी समितीने एकसंघ राहूनच पुढील हालचाली करण्याचे मत व्यक्त केले.
अलीकडील इंग्रजी फलकांवरील दगडफेकीच्या घटनांवर पोलिसांनी हालचाल न केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला गेला.
किणेकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र शासन निरुत्साही भूमिकेत असल्याची खंत व्यक्त केली. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. एम.जी. पाटील यांनी हुतात्मा स्मारकासंबंधित बाबी स्पष्ट केल्या आणि उपस्थितांना समन्वय साधण्यासाठी आग्रह केला.
मराठी शाळांत कन्नड माध्यम सुरू करण्याच्या प्रयत्नांचा आर. एम. चौगुले यांनी तीव्र शब्दांत विरोध केला. “महामेळावा हा कोणत्याही परिस्थितीत घ्यावाच,” असे ठाम मत नेताजी जाधव यांनी व्यक्त केले. व्यावसायिक आस्थापनांच्या फलकांवर केलेल्या रंगकामाबद्दल रामचंद्र मोदगेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
पूर्वी परवानगीसंबंधी आलेल्या अडथळ्यांचा उल्लेख करत मालोजी अष्टेकर यांनी कामकाज गोपनीय ठेवा, अशी सूचना दिली. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनोहर हुंदरे यांनी केली.
बैठकीच्या शेवटी मनोहर किणेकर यांनी सांगितले, “८ डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी महाराज चौकात महामेळावा अटळ आहे. मराठी बांधवांनी १ नोव्हेंबरप्रमाणे ताकद दाखवावी. अटक जरी झाली तरी लोकांची संख्या इतकी असावी की पोलिसांना हाताळणे कठीण जावे.”
तसेच ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्तांकडे परवानगी व कर्नाटक रक्षण वेदिकेविरुद्ध निवेदन देण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
या बैठकीला मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, एम. जी. पाटील, आबासाहेब दळवी, आर.एम. चौगुले, नेताजी जाधव, रामचंद्र मोदगेकर, राजू मरखे, पियुष हावळ, रावजी पाटील, मुरलीधर पाटील, बी.बी. देसाई, राजाराम देसाई, मोनापा पाटील, मोहनगेकर, अनिल पाटील, मनोहर हुंदरे आदी उपस्थित होते.








