- केएलई हॉस्पिटलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन’ साजरा
बेळगाव : कर्करोगाशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या बालकांना मानसिक बळ आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण तर्फे केएलई. हॉस्पिटल येथे ‘आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन’ अर्थपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढणाऱ्या या ‘बालवीरां’च्या धैर्याचे कौतुक करत त्यांना भावनिक आधार देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. रोटरीच्या ‘स्वतःपेक्षा सेवा मोठी’ या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव या उपक्रमातून दिसून आला. जेएनएमसी व केएलई हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. अभिलाषा तसेच कॅनकिड्स संस्थेच्या कु. श्रुती कार्लिंगण्णावार यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमास क्लबच्या अध्यक्षा रो. ॲड. विजयलक्ष्मी मन्नीकेरी, सचिव रो. कावेरी करूर, खजिनदार रो. सुरेखा मुम्मीगट्टी, तसेच रो. सविता वेसणे आणि रो. डॉ. श्रीदेवी रेवण्णवर उपस्थित होत्या. उपचाराधीन बालकांना मदत करणाऱ्या देणगीदारांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.
अध्यक्ष रो. ॲड. विजयलक्ष्मी मन्नीकेरी यांनी मनोगतात सांगितले, “या मुलांचे धैर्य, त्यांची जिद्द आणि हसतमुखाने संकटांना सामोरे जाण्याची ताकद पाहून आम्हालाही समाजासाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते. केवळ एक दिवस साजरा करणे हा उद्देश नसून, या बालकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे आणि त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहणे हेच आमचे खरे ध्येय आहे.”
या उपक्रमामुळे रुग्णालयातील वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली असून, समाजातील विविध घटकांनी अशा सेवाभावी कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.








