बेळगाव / प्रतिनिधी
कपिलेश्वर तलावात भांदूर गल्ली येथील एका रहिवाशाचा मृतदेह आढळून आला आहे. रविवारी सकाळी तरंगताना एक मृतदेह आढळला. तो पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली. सचिन मनोहर पाटील (वय ४६) राहणार भांदूर गल्ली असे त्याचे नाव आहे.
रविवारी सकाळी १० वाजता स्थानिक नागरिकांनी एक मृतदेह तरंगताना पाहिला. खडेबाजार पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपलब्ध माहितीनुसार बाहेर जाऊन येण्याचे सांगून शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सचिन आपल्या घराबाहेर पडला होता. तलावात पडून त्याचा मृत्यू झाला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.