बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेल्या कन्नडसक्तीविरोधात सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार असून पुन्हा एकदा मराठी माणसाची ताकद दिसणार आहे.
सीमाभागात कर्नाटक सरकारने कन्नडसक्ती तीव्र केली आहे. सरकारी कार्यालयातील फलकांवरील इंग्रजी व मराठी भाषेतील नामफलक काढून केवळ कन्नड भाषेत नामफलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी कामकाज केवळ कानडी भाषेतच व्हावे असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी भाषेची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवेदन देण्यात आले होते. सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा धडक मोर्चा निघणार आहे. सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या महामोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समितीने बैठका घेऊन जनजागृती करावी व भविष्य महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आरपारच्या लढाईला सज्ज राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेत मराठी भाषेविषयी आवाज उठवत सभात्याग केलेल्या समितीच्या नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे कन्नड सक्तीविरोधात कायदेशीर लढा देण्याच्या दृष्टीने पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी पाच मराठी भाषिक वकिलांवर कायदेशीर लढ्याची जबाबदारी ॲड. अमर यळ्ळूरकर, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. महेश बिर्जे, ॲड. सुधीर चव्हाण व ॲड. सडेकर यांच्यावर देण्यात आली आहे.
दरम्यान, लवकरच कोल्हापूर मुक्कामी सीमाप्रश्नी तज्ञ समितीच्या सदस्यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रामचंद्र मोदगेकर, मनोहर हुंदरे, बी. डी. मोहनगेकर, रणजीत पाटील, वसंत नावलकर, पियुष हावळ, बाळासाहेब शेलार, लक्ष्मण पाटील, गोपाळ देसाई, ऍड. एम. जी. पाटील, जयराम देसाई आदींनी आपले विचार मांडले.
बैठकीला रावजी पाटील, मल्लाप्पा गुरव, अजित वसंतराव पाटील, मुरलीधर पाटील, पांडुरंग सावंत, बी. बी. देसाई, गोपाळ पाटील, अनिल पाटील, विठ्ठल पाटील, मोहन बेनके, विकास कलगटगी, बी. ओ. येतोजी, ॲड. अमर यळ्ळूरकर, ॲड. महेश बिर्जे आदी उपस्थित होते.