• बेळगाव तालुका म. ए. समितीचे मराठी भाषिकांना आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषिक गेली सहा दशके ‘१ नोव्हेंबर’ हा दिवस काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळत आहेत. राज्य पुनर्रचनेच्या वेळी १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठीबहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर (आताचे कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आला. या निर्णयाविरोधात सीमाभागातील नागरिकांनी केंद्र सरकारकडे वारंवार न्यायाची मागणी केली, परंतु अद्याप तो मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर २०२५ रोजी काळा दिन आणि कडकडीत हरताळ मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने पाळण्यात येणार आहे. या दिवशी मराठी भाषिकांनी काळे वस्त्र परिधान करून मूक सायकल फेरीत सहभागी व्हावे, तसेच सर्व व्यापारी, शासकीय आणि वैयक्तिक व्यवहार बंद ठेवून हरताळ पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही मूक सायकल फेरी धर्मवीर संभाजी उद्यानातून सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन बेळगाव शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा होईल.

या कार्यक्रमात सीमाभागातील सर्व मराठी भाषिक नागरिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी, युवा आघाडी, महिला आघाडी तसेच विविध घटक समित्यांचे कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अ‍ॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील आणि मोनाप्पा पाटील आदींनी संयुक्तरीत्या केले आहे.