- महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचीच्या बैठकीत मराठी भाषिकांना आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावची व्यापक बैठक कावळे संकुल येथील समिती कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनानिमित्त मूक सायकल फेरीत मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
१९५६ साली भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठी बहुल प्रदेश अन्यायाने म्हैसूर (आताचे कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आला. या अन्यायाचा निषेध म्हणून दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून साजरा केला जातो. सीमाभागातील मराठी बांधवांचा महाराष्ट्रात विलीन होण्याचा निर्धार आजही कायम असल्याचे या दिवसाचे प्रतीक मानले जाते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने यावर्षीच्या मूक सायकल फेरीत सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले असून, मराठी जनतेची एकजूट दाखविण्याचे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी या वेळी केले.
बैठकीत मराठी भाषिकांचा अपमान करणारे आणि सीमाप्रश्नावर भडकाऊ विधाने करणारे खासदार जगदीश शेट्टर तसेच काही कन्नड संघटनांच्या नेत्यांचा निषेध व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच उच्च न्यायालयाने काळ्या दिनावरील याचिकेत मराठी भाषिकांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाबद्दल ॲड. महेश बिर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांनी सांगितले की, “उच्च न्यायालयाच्या आदेशांचा मान राखत प्रशासनाने काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीला कोणत्याही प्रकारे अडथळा आणू नये आणि संविधानिक अधिकारांचा भंग होऊ देऊ नये.”
या बैठकीस उपाध्यक्ष वासू सामजी, गुंडू कदम, पदाधिकारी सुरज कुडुचकर, खजिनदार विनायक कावळे, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, महेश जाधव, आकाश भेकणे, सुरज चव्हाण, विकास भेकणे, प्रवीण धामनेकर, सौरभ तोंडले, अश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.








