• तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय : गावागावांत होणार जनजागृती मोहीम

बेळगाव / प्रतिनिधी

भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात समाविष्ट झाल्यापासून मराठी भाषिक समाजात असंतोष आहे. या अन्यायाचा निषेध म्हणून 1956 पासून दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळला जातो. हा दिवस कोणत्याही भाषेच्या वा राज्याच्या विरोधात नसून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधातील निषेधाचा प्रतीक असल्याचे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने स्पष्ट केले.

यावर्षी काळादिनानिमित्त मूक सायकल फेरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळावा यासाठी तालुका समितीने गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. मराठा मंदिर येथे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. सचिव अॅड. एम. जी. पाटील, तसेच लक्ष्मण होनगेकर, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कार्यकर्त्यांनी काळादिनाच्या आयोजनाबाबत सूचना मांडल्या. दिवाळीनंतर ग्रामीण भागात प्रचारफेरी आयोजित करून जनतेला सहभागी करून घेण्याचा निर्णय झाला. या वेळी बोलताना मनोहर किणेकर म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमाप्रश्नाच्या तोडग्यासाठी लढणारी संघटना असून काही स्वार्थी फितुरांमुळे राष्ट्रीय पक्षांना बळ मिळाले आहे. मराठी समाज लवकरच अशा फितुरांना जागा दाखवेल, असा त्यांनी इशारा दिला.

अनिल पाटील, पियुष हावळ, शिवाजी खांडेकर, मनोहर संताजी, दीपक पावशे, महादेव कंग्राळकर, मनोहर हुंदरे, आर. के. पाटील यांसह अनेक कार्यकर्त्यांनी बैठकीत आपली मते मांडली.

  • समिती विरोधातील वक्तव्यांचा घेतला समाचार :

दरम्यान, मागील काही दिवसांत काही कन्नड संघटनांच्या नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवर केलेल्या वक्तव्यांबद्दल तीव्र प्रतिक्रिया बैठकीत नोंदवण्यात आली. काही कन्नड नेत्यांसह खासदार जगदीश शेट्टर व मंत्री एच. के. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांचा समितीने समाचार घेत, “आम्हाला महाराष्ट्रात जाण्यास सांगण्यापेक्षा, आम्ही तिथे जाण्यासाठीच 70 वर्षांपासून संघर्ष करत आहोत,” असे स्पष्ट उत्तर दिले.