- परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचे मत ; हिंदवाडी येथे शोकसभा
- विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : “अनंतराव जांगळे यांनी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे म्हणूनच त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित व्हावे, त्यासाठी आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू, अशी भावना माजी आमदार गुरुवर्य परशुराम भाऊ नंदीहळ्ळी यांनी व्यक्त केली.
२३ फेब्रुवारी रोजी निधन झालेल्या अनंतराव जांगळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हिंदवाडी येथील हिंद हाउसिंग सोसायटी कार्यालयात आयोजित शोकसभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी नंदीहळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जांगळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जांगळे यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक व सहकारी संस्थांमध्ये सक्रिय योगदान दिले होते. त्या संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने शोकसभेला उपस्थित होते. व्यासपीठावर अनंत लाड, लक्ष्मण शिंदे, नेताजी जाधव, मंजुनाथ शेठ, प्रकाश मरगाळे, शशिकांत रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनंत लाड यांनी प्रास्ताविकातून जांगळे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर विविध वक्त्यांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या. “मितभाषी पण कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व” अशी त्यांची ओळख असल्याचे लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले. मंजुनाथ शेठ यांनी त्यांच्या शांत व सहकार्यशील स्वभावाची आठवण करून दिली. शशिकांत रणदिवे यांनी जांगळे हे आनंदवाडीतील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सामाजिक कार्यकर्ते होते, असे नमूद केले.
नेताजी जाधव यांनी सार्वजनिक वाचनालय आणि मराठा समाज सुधारणा मंडळातील त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रकाश मरगाळे यांनी १९९५ पासूनचा सहवास सांगत, “२५ वर्षांच्या सहकार्यात त्यांनी कधीही गैरवर्तन केले नाही; सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची पोचपावती म्हणजे विविध नाट्यप्रयोग,” असे मत व्यक्त केले.
जांगळे यांच्या सून अमृता अभिजीत जांगळे यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करत, “त्यांनी सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणूनच आपुलकी दिली,” असे सांगितले. चिरंजीव अभिजीत जांगळे यांनी वडिलांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा व त्यांचे सामाजिक कार्य पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
शेवटी दोन मिनिटे शांतता पाळून अनंतराव जांगळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध संस्था, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








