- शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य देणार : युवराज कदम
बेळगाव / प्रतिनिधी
कमांड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (काडा) अध्यक्षपदी नुकतेच निवड झालेले युवराज कदम यांनी आज (दि. १३ ऑक्टोबर) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. याप्रसंगी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, तसेच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना कदम म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी रस्ते, चेक डॅम आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. नद्या आणि कालव्यांमधील गाळ काढण्यावर भर देत शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधणे हे माझे प्रमुख ध्येय असेल.”
मराठी भाषिक समाजातील नेत्याला काडाच्या अध्यक्षपदी संधी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी आमदार राजू कागे, जिल्हा हमी योजना समितीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. विविध संस्थांकडून युवराज कदम यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.