- महापालिकेच्या बेजबाबदार गॅरेज व्यवस्थेचे वास्तव उघड
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेचा कचरा संकलन आणि गॅरेज व्यवस्थेतील ढिसाळपणा आज चव्हाट्यावर आला. कचरागाडीचा चालक रजेवर गेल्याने संपूर्ण व्यवस्था ठप्प झाली होती. यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढू नये आणि परिसरात कचरा साचून दुर्गंधी पसरू नये, या चिंतेतून नगरसेवक शंकर पाटील यांनी थेट पुढाकार घेत स्वतः कचरागाडी चालवत घरोघरी कचरा संकलन केले.
आज वाहन वेळेवर न आल्यास रस्त्यांवर कचरा पडतो, चिखल आणि दुर्गंधी निर्माण होते आणि त्याचा फटका थेट नागरिकांना बसतो. ही परिस्थिती ओळखून नगरसेवक शंकर पाटील यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः गाडी घेऊन वॉर्डांमध्ये फिरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले, मात्र त्याचवेळी महापालिकेच्या व्यवस्थेवर तीव्र टीकाही झाली.
यावेळी शंकर पाटील यांनी महापालिकेच्या गॅरेज व्यवस्थेवर आश्चर्य व्यक्त केले. गॅरेज उघडे असतानाही तेथे ना चौकीदार, ना जबाबदार कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. कोणीही वाहन घेऊन जावे, अशी बेवारस अवस्था असल्याने सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकाराची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. महापालिकेच्या गॅरेज आणि कचरा विल्हेवाट व्यवस्थेकडे होत असलेले दुर्लक्ष ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेची बेजबाबदार वृत्ती दर्शवते, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातील कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे.







