बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगांव येथे आज शाळेच्या पहिल्या ‘ज्योतिर्मयी’ नामक शालेय मॅगझिनच्या पहिल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यिक विचारांना व्यासपीठ देण्यासाठी हे नियतकालिक सुरू करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शाळेचे संस्थापक माजी चेअरमन डॉ. पी. डी. काळे यांच्याहस्ते या ‘ज्योतिर्मयी’ मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याला संगोळी सर, आर. के. पाटील, आर. एस. पाटील, नितीन घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. सोनाली कंग्राळकर, शालेय शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे आणि शाळेच्या या प्रयत्नाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका श्रीमती कंग्राळकर यांनी नियतकालिकाच्या निर्मितीमागचा उद्देश स्पष्ट केला आणि सर्वांचे आभार मानले.








