- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अविट मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध
बेळगाव : द. म. शि. मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन ‘समन्वय’ मराठा मंदिर (खानापूर रोड) येथे उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमांची अविट मेजवानी अनुभवत उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
प्रार्थनागीत, देशगीते, लोकगीते, भावगीते व भक्तिगीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ‘वुमन क्रिकेट’ ही नाटके विशेष आकर्षण ठरली. सामाजिक संदेश आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगती प्रभावीपणे मांडण्यात आली.
पहिल्या दिवशी डॉ. मिलिंद हलगेकर तर दुसऱ्या दिवशी डॉ. शैलेश पाटील प्रमुख अतिथी होते. व्यासपीठावर द. म. शि. मंडळाचे पदाधिकारी, शाळेचे संस्थापक, व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या सोनाली कंग्राळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नॅशनल लेव्हल स्विमिंग चॅम्पियन वेदांत मिसाळे आणि क्रिकेटपटू सिद्धार्थ अधिकारी यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
अतिथींनी पालकांना मार्गदर्शन करताना मुलांसाठी वेळ, संवाद, प्रेम व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. चेअरमन आर. के. पाटील यांनी मुलांची स्वप्ने ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ॲडव्हायझरी डायरेक्टर मायादेवी अगसगेकर यांनी शाळेच्या भावी योजनांची माहिती दिली, तर प्राचार्या सोनाली कंग्राळकर यांनी वार्षिक प्रगती अहवाल सादर केला.
यशस्वी आयोजन व विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले असून, या स्नेहसंमेलनाने ज्योती सेंट्रल स्कूलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीत मानाचा तुरा रोवला आहे.








