बेळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून ज्योती सेंट्रल स्कूल येथे उत्साहात कवी संमेलन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून मराठी भाषेचा जागर घडवून आणला.

या काव्यमैफलीत कु. राशी यल्लाप्पा पाटील, कु. पल्लवी राजकुमार पाखरे, कु. श्रवण महेश बेन्नाळकर यांनी आपल्या कल्पनाशक्तीने सजवलेल्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कविवर्य कुसुमाग्रज यांची गाजलेली ‘कणा’ ही कविता कु. आदिनाथ पाटील याने प्रभावीपणे सादर केली.

विद्यार्थ्यांसह शिक्षिकांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. श्रीमती पद्मश्री भेंडीगीरी, श्रीमती अनुपमा शिंदे, श्रीमती अश्विनी चकडे, श्रीमती आरती आणि श्रीमती शिल्पा अंगडी यांनी कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितांचे वाचन करून कार्यक्रमाची उंची वाढवली.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी स्वतः रचलेली बडबडगीते सादर करत चिमुकल्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका आरती चिंगळी यांनी केले. संगीत शिक्षिका अक्षता मोरे यांच्या मराठी भाषा गौरव गीताने संमेलनाची सांगता झाली.

मराठी भाषेचा वारसा जपणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालक व शिक्षणप्रेमींनी कौतुक केले.