बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल (कॅम्प, बेळगाव) येथे ‘बाल संरक्षण कायदे’ या विषयावर विशेष माहिती कार्यक्रम उत्साहात पार पडला.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सौदामिनी सावंत यांनी केले. यावेळी शालेय शिक्षकांनीच ‘संसाधन व्यक्ती’ (Resource Persons) म्हणून जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांना कायद्याची सखोल माहिती दिली.
यामध्ये श्रीमती मुक्ता लोहार यांनी ‘बाल तस्करी’ (Child Trafficking), श्रीमती आरती चिंगळी यांनी ‘पोक्सो कायदा’ (POCSO Act), श्रीमती अश्विनी चकडे यांनी ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ आणि श्रीमती शीला गेज्जी यांनी ‘बालकामगार प्रतिबंध’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला बालवाटिका शिक्षिका श्रीमती काजल बांदेकर, संगीत शिक्षिका श्रीमती अक्षता मोरे तसेच शालेय क्लर्क श्रीमती राजश्री पागा यांचे सहकार्य लाभले.
केवळ व्याख्यानेच नव्हे तर, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विशेष व्हिडिओ दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती सौदामिनी सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्कांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल मोठी जागृती निर्माण झाली आहे.







