• कराटे आणि जलतरण स्पर्धेत विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

बेळगाव : ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कराटे आणि जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रीशा बाळकृष्ण मासेकर हिने कुमिते प्रकारात सुवर्ण, तर कटा प्रकारात कांस्य पदक पटकावले. स्वरा बाळकृष्ण मासेकर हिने कटा प्रकारात सुवर्ण आणि कुमितेत रौप्य पदक मिळवत दुहेरी यश संपादन केले.

दरम्यान, बेळगाव येथे झालेल्या पीव्हीआर जलतरण स्पर्धेत वेदांत मिसाळे याने ५० व १०० मीटर बटरफ्लाय तसेच आय.एम. प्रकारात सुवर्ण पदके जिंकली. बॅकस्ट्रोक आणि फ्री-स्टाईल प्रकारात त्याने रौप्य पदकाची कमाई केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला स्पर्धेतील ‘विजेतेपद’ देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे आणि मुख्याध्यापिका सोनाली कंग्राळकर यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.